(नवी दिल्ली)
भारतातील तरुणाई ऑनलाइन गेम्सच्या विळख्यात सापडली आहे. २०२२ मध्ये भारतात १५०० कोटी वेळा गेम्स डाऊनलोड केले गेले. हे चीन आणि अमेरिकेनंतर जगात सर्वात जास्त प्रमाण आहे. अमेरिका, चीन आणि जपाननंतर जगामध्ये भारतात ऑनलाइन गेम्सची सर्वात जास्त आवड असल्याचे दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण तरुण लोकसंख्या, बेरोजगारी आणि स्वस्त मोबाइल डेटा आहे. गेमिंग कॅपिटल फंड लुमीकाईनुसार भारतात २०२२ मध्ये ऑनलाइन गेम्सचा व्यवसाय सुमारे ८९६७ कोटी रुपयांचा आहे.
भारत ऑनलाईन गेममध्ये जगात चौथा देश ठरला आहे. यावरून तरुणांना ऑनलाईन गेमचे वेड किती वाढले आहे, याचा अंदाज येतो. यासंदर्भात रेवेनॅट इस्पोट्र््सचे संस्थापक रोहित जगासिया म्हणाले की, अॅप स्टोअरवरून चीनचे बॅटलग्राउंड गेम हटवण्याच्या भारत सरकारच्या आदेशानंतर उद्योगाला झटका बसला होता. मात्र, यामुळे आपली कमाई वाढली होती.
गुंतवणूकदार भारतात ऑनलाइन गेमिंगमध्ये बरीच गुंतवणूक करू इच्छितात. ऑनलाइन गेम करमणूक नव्हे तर कमाईचे साधन बनले आहे. गेम बनवण्यापासून खेळण्यापर्यंत पैसे मिळत आहेत. ई-स्पोर्टसच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये बक्षिसांची रक्कम मिळत असते, असे लुमीकाईच्या संस्थापक सलोनी सेहगल यांनी सांगितले.