(नवी दिल्ली)
चीनच्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या वन प्लस आणि रीयलमीने भारतातील टेलिव्हिजनचे उत्पादन आणि विक्री थांबवली आहे. दोन्ही कंपन्यांची भारतातील स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक आहे पण अचानक त्यांनी या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनची कंपनी शाओमी भारताच्या स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वन प्लस आणि रीयलमी स्मार्टफोन व्यवसायात कायम राहतील. या कंपन्यांनी भारतात टीव्ही विक्री चॅनेल आणि ब्रँडिंगमध्ये गुंतवणूक केली होती. याशिवाय, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्रे हॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग सेवांच्या वाढीमुळे देशातील स्मार्ट टीव्हीच्या मागणीवर याचा परिणाम झाला आहे. क्रिकेट विश्वचषकामुळे देशात टीव्हीच्या विक्रीत मोठी वाढ होत असताना या दोन्ही कंपन्यांनी टीव्हीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सणासुदीचा हंगामही सुरू आहे. त्यामुळे टीव्हीसह सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली आहे.
चीनी कंपन्या शाओमी, वन प्लस, रीयलमी, टीसीएल आणि आयफालकॉन यांनी २०१७-१८ मध्ये भारतातील स्मार्टफोन टीव्ही मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री केली होती. या कंपन्यांनी एलजी, सॅमसंग आणि सोनी पेक्षा ३० ते ५० टक्के स्वस्त असलेले मॉडेल लॉन्च केले होते. बाजारावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनी टीव्ही ब्रँड किंमती कमी करून बाजार काबीज करत होत्या. त्यामुळे त्यांचे नुकसान वाढले. यामुळेच त्यांनी आता टीव्ही क्षेत्रातील उत्पादन बंद केले आहे. त्यांचे लक्ष आता पूर्णपणे स्मार्टफोन मार्केटवर आहे.