(नवी दिल्ली)
भारताने येत्या पाच वर्षांत पहिले ध्रुवीय संशोधन जहाज तयार करण्याची योजना आखली आहे. याबाबत केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली. अंटार्क्टिकामधील भारताचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आहे. ‘जहाजाबाबतच्या प्रस्तावाला यंदाच्या आर्थिक वर्षात कॅबिनेटची मंजुरी मिळणे अपेक्षित आहे,’ असेही ते म्हणाले.
‘या जहाजाची किंमत अंदाजे २,६०० कोटी रुपये आहे. आर्थिक वर्षात जहाजासाठीच्या खर्चाचा अंदाज मंत्रिमंडळात प्रस्तावित केला जाईल. येत्या पाच वर्षांत जहाज तयार करण्याची तयारी सध्या सुरु आहे. २०१४ मध्ये कॅबिनेटने जहाजाच्या अधिग्रहणासाठी १,०५१ कोटी रुपये मंजूर केले होते. यासाठी निविदा देखील काढण्यात आली होती. मात्र, जहाज बांधण्यासाठी जबाबदार असलेल्या कंपनीने दिलेल्या काही अटींमुळे हा प्रकल्प बारगळला,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘भारतीय महासागराला लागून असलेल्या ध्रुवावरील अभ्यास या जहाजाद्वारे केला जाणार आहे. मान्सूनवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. याच मान्सूनमध्ये सध्या होत असलेले बदल, आगामी काळात होणारे बदल, जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदलाचा मान्सूनवर होणारा परिणाम या साऱ्याचा शोध घेणे गरजेचे आहे. याच अभ्यासासाठी भारताने या दोन्ही ध्रुवांकडे लक्ष केंद्रित केले आहे. गोव्यातील अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन राष्ट्रीय केंद्र त्यासाठी काम करीत आहे. यामध्ये आता भारताचे चोहोबाजूंनी बर्फांनी व्यापलेले हे पहिले जहाज लवकरच येईल.’