(श्रीहरिकोटा)
आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्राहून उद्या शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता भारताचे ‘चांद्रयान-3′ आकाशात झेपावणार आहे. या मोहिमेची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो ) तयारी पूर्ण केली असून या मोहिमेकडे आता देशवासियांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान-2 मध्ये कोणत्या त्रुटी राहिलेल्या याचा देखील अभ्यास इस्त्रोने केला आहे.
चांद्रयान-2 या मोहिमेत अंशत: यश आल्यानंतर तब्बल चार वर्षांनी भारताची चांद्रयान-3 मोहीम प्रत्यक्षात उतरणार आहे. 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-2 मोहिमेंतर्गत विक्रम नावाचे लँडर आणि प्रज्ञान नावाचे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने 7 सप्टेंबर 2019 रोजी या यानाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी असलेला संपर्क तुटला होता. ‘विक्रमन लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 335 मीटर (0.35 किमी) अंतरावर असताना इस्रोचा त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. ‘इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड सेंटर या विभागाने सांगितल्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागापासून साधारण 5 किमी ते 400 मीटर असतानाच विक्रम लँडरमध्ये बिघाड व्हायला सुरुवात झाली होती. हा बिघाड उड्डाणाच्या ‘फाईन ब्रेकिंग फेज’ या शेवटच्या टप्प्यात झाला होता.
कार्यालयात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवरही असा बिघाड आलेखाच्या माध्यमातून दिसून येतो. विक्रम लँडर चंद्रापासून दोन किलोमीटर अंतरावर असताना त्याने दिशा बदलायला सुरुवात केली. पुढे चंद्रापासून 1 किमी ते 500 मीटर अंतरावर असेपर्यंत ‘विक्रम आपली दिशा बदलत राहिला. चंद्राच्या पृष्ठभागापासून एक किमी ते 500 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरची गती अपेक्षेपेक्षा जास्त होती. लँडर 59 मीटर प्रतिसेकंद म्हणजेच साधारण 212 किमी प्रतितास उभ्या गतीने आणि 48.1 मीटर प्रतिसेकंद म्हणजेच 173 किमी प्रतितास आडव्या गतीने चंद्राच्या पृष्ठभागाावर जात होते. ठरवलेल्या योजनेनुसार चंद्राच्या पृष्ठभागाच्या 400 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरची गती कमी होणे अपेक्षित होते. तसेच निश्चित केलेल्या ठिकाणी या लँडरने फेऱ्या मारायला हव्या होत्या. त्यानंतर सामान्य माणूस ज्या गतीने चालतो, त्या गतीने लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायला हवे होते. मात्र, लँडरची गती अपेक्षेपेक्षा जास्त होती. त्यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर न उतरताच थेट कोसळले. त्यानंतर लँडरचा ‘इस्रो’शी असलेला संपर्क तुटला.
‘इस्रो`चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान झालेल्या चुकांची अलीकडेच सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार- तीन चुकांमुळे चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर उतरू शकले नाही. इंजिन्सनी अपेक्षेपेक्षा जास्त दाब निर्माण केला, लँडर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वळाला आणि चंद्राचा पृष्ठभाग जवळ असताना लँडरने वेग वाढवला. या तिन्ही चुका पुन्हा होणार नाहीत, याची यावेळी काटेकोरपणे काळजी घेण्यात आली आहे.