(क्रीडा)
श्रीलंकेच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून हरमनप्रीत कौरने कर्णधार खेळी केली. तिने ६३ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. तसेच हरलीन डेओलने ३४ धावांची खेळी केली. शेफाली वर्मा (३५ धावा) आणि दिप्ती शर्मा (२२ धावा) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. तसेच पूजा वस्त्राकारनेही १९ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले.या डावात श्रीलंकेकडून इनोका रणवीरा हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ओशादी रणशिंगे हिनेही २ विकेट्सचे योगदान दिले.
या सामन्यात (IND vs SL) श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४८.२ षटकात १७१ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३८ षटकातच ६ विकेट्सच्या नुकसानावर श्रीलंकेचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना नावावर केला.
तत्पूर्वी श्रीलंका संघाकडून नीलाक्षी डी सिल्वा हिने सर्वाधिक धावा केल्या होत्या. ६३ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने तीने ४३ धावांची खेळी खेळली होती. तसेच हसीनी पेरेरा हिने ३७ धावा जोडल्या होत्या. हर्षिता माधवी (२८ धावा), अनुष्का संजीवनी (१८ धावा) यांनीही थोडेफार योगदान दिले होते.
या डावात भारताकडून रेणुका सिंग हिने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दीप्ती शर्मानेही श्रीलंकेच्या ३ फलंदाजांता तंबूचा रस्ता दाखवला होता. पूजा वस्त्राकारनेही २ फलंदाजांना बाद केले होते. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि राजश्री गायकवाड यांनी प्रत्येकी एक विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला सर्वबाद करण्यात हातभार लावला होता.