(क्रीडा)
आशिया चषक स्पर्धेच्या आपल्या शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला आहे. विराट कोहलीच्या वादळी शतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकाचा शेवट गोड केला आहे. विराट कोहलीनं तब्बल दोन वर्ष आणि 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १११ धावाच करू शकला. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. तर मुजीब उर रहमानने १८ आणि रशीद खानने १५ धावांचे योगनदान दिले.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ बळी घेतले. अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दरम्यान, दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे. पाकिस्तानपाठोपाठ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. त्याचवेळी अफगाणिस्तानला आधी श्रीलंकेने आणि नंतर पाकिस्तानने पराभूत केले होते.
सुपर-४ फेरीत टीम इंडियाने दोन गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. ते चौथ्या स्थानावर राहिले