(अनंतपुरम)
केरळमधील अनंतपुरा मंदिरात राहणा-या बाबिया मगरीचे आज निधन झाले. ही मगर मांसाहाराऐवजी मंदिराच्या प्रसादावर जगायची. तसे तर लाखो वर्षांपासून पृथ्वीवर राहणारी मगर मांसाहारी प्राणी आहे. परंतु बाबिया ही मगर मंदिरात राहून शाकाहारी खाद्य खायची. मात्र, ९ ऑक्टोबरला बाबियाचा मृत्यू झाला. ही पूर्णत: माणसाळलेली होती. तिने कुणावरही हल्ला केला नाही. त्यामुळे तिची वेगळी ओळख होती.
मंदिराजवळच्या तलावात तिचं वास्तव्य होतं. पण तिने कधीच कोण्या भाविकाला जखमी केलं नाही, असं मंदिराशी संबंधित लोकं सांगतात. चक्क अंत्ययात्रा काढत या शाकाहारी मगरीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळा ही मगर देवदर्शन करण्यासाठी मंदिर परिसरात यायची, असंही सांगण्यात आलंय. ही घटना केरळच्या कारागोड येथील आहे.
केरळ राज्यातील कासरगोड इथं श्री अनंदपद्मनाभ स्वामी मंदिराची रक्षक म्हणून ज्या मगरीकडे पाहिलं जातं, त्या बाबिया नावाच्या मगरीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. अनंतपुरा गावातील मंदिराच्या तलावात बाबिया मगरीचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून बाबिया मगरीची प्रकृती खालावली होती. तिनं खाणंपिणं सोडलं होतं, असं मंदिराचे ट्रस्टी उदय कुमार आर गट्टी यांनी सांगितलं. मंगळुरु येथील पिलुकुला बायोलॉजिकल पार्कातील पशु चिकित्सकांनी या मगरीच्या मृत्यूबाबत तपास सुरु केला आहे, अशी माहिती मिळत आहे.