(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
लांबलेला पाऊस आणि त्यामुळे कापणीला झालेला उशीर त्यामुळे उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे भातखरेदीच्या नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार भात खरेदी योजनेंतर्गंत शेतकरी नोंदणीच्या कालावधीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भात खरेदी योजनेंतर्गंत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सन 2022-23 या वर्षी पिकपेऱ्यामध्ये भाताची नोंद असलेल्या सातबारा उताऱ्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी तशा नोंदी केलेल्या नसल्याने अनेक साताबारा उताऱ्यांवर यावर्षीच्या पिकपेऱ्याची नोंदी झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे भात खरेदी योजनेंतर्गंत शेतकरी नोंदणीला शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतामध्ये पिकणारे भात शासनाकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकणाऱ्या भातातून उत्पन्न मिळते. मात्र, अद्यापही भात कापणी सुरू आहे. पीकपेरा नोंदणी असलेला ऑनलाईन सातबारा उतारा मिळण्यामध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे भातविक्रीसाठी नावनोंदणी करण्याला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नावनोंदणीसाठी शासनाकडून देण्यात आलेला कालावधीही अपुरा ठरत आहे. नावनोंदणीच्या कालावधीमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्याची दखल घेत शासनाने 30 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना भातविक्री करायची आहे त्या शेतकऱ्यांना विहित कागदपत्रांसमवेत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने महिनाअखेरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.