(पुणे)
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळं पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला होणार आहे. भाजपनं कसब्यातून पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि चिंचवडमधून आश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडचा किल्ला राष्ट्रवादी लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसनं कसब्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली असून चिंचवडमध्ये राहुल कलाटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळं आता भाजपच्या बालेकिल्ल्यातील दोन्ही पोटनिवडणुकीतील चित्र अगदी स्पष्ट झालं आहे.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला होता. परंतु चिंचवडच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होतं. परंतु काल संध्याकाळी उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बोलणी झाल्यानंतर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढावी लागणार आहे.
चिंचवडमध्ये भाजपनं लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांचे दीर शंकरशेठ जगताप भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळं आता चिंचवडमध्ये मतदानापूर्वीच भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर या उमेदवारीसाठी भाजपामध्ये अनेकजण इच्छूक होते. मात्र उमेदवारी न मिळालेल्या या नाराजांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या २६ फेब्रुवारीला दोन्ही मतदारसंघात निवडणूक होणार असून २ मार्चला निकाल लागणार आहे. त्यामुळं पुण्यातील दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.