शिंदे गट शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी वेळी उलटतपासणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांना एकनाथ शिंदेंबरोबर जाण्यावरून प्रश्न केले. त्यावर महाविकास आघाडीबद्दल नाराज होतो, असं सामंत म्हणाले. पण, त्या मविआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतात, असा प्रश्न विचारल्यानंतर सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडी स्थापन करण्यावर बहुसंख्य आमदारांचा आणि खासदारांचा विरोध होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देऊन आम्हा सर्वांची समजूत काढली. म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली, त्यामुळे आमदारांची खूप नाराजी होती असे सामंत यांनी आपल्या साक्षीत आणि उलटतपासणीत म्हटले. त्यावर, तुम्ही इतके नाराज होतात तर याच मविआ सरकारमध्ये 2019 ते 2022 या काळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री बनलात, असा उपरोधिक प्रश्न करत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सामंत यांना कोंडीत पकडले. त्यावर, मविआ सरकार स्थापनेपूर्वीच आम्ही आमची नाराजी व्यक्त केल्याचे सामंत यांनी सांगितले. तर, उद्धव ठाकरे यांनाच का विनंती केली ? त्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे का गेला नाहीत, असा उपप्रश्न कामत यांनी केला. त्यावर, मी आणि माझ्या सहकारी आमदारांनी एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. तसेच आमच्या मागणीनुसार त्यांनीही अनेकवेळा उद्धव ठाकरेंची भेट घेऊन हे सांगितले होते. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.
ठाकरे गटाचे वकील कामत यांनी उदय सामंत यांना बैठकीत उपस्थित असलेल्या 24 सदस्यांच्या सहीचे कागदपत्र दाखवले. त्यावरून यात आपली सही आहे की नाही असा सवाल केला. त्यावर शिवसेना विधिमंडळ पक्षाची कथित बैठकीच्या उपस्थितांच्या यादीत नोंदीवर असलेली सही आपली नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. 3 जुलै 2022 रोजी आपण विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी त्यांच्या बाजूने मतदान केले आहे का ? त्यासाठी पक्षाने व्हीप काढला होता हे खरे आहे काय? ठाकरे गटाच्या वकिलांकडून असे विचारताच, सामंत यांनी आपण आपल्या सद्सदविवेक बुद्धीला जागृत ठेवून अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर उत्तम काम करतील असे वाटल्याने आपण त्यांना मतदान केले. परंतु यासाठी व्हीप काढला कि नाही ते माहित नसून आपल्याला व्हीप मिळाला नसल्याचा खुलासाही यावेळी केला.
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे महाविअकास आघाडी असल्याचे कारण उदय सामंत यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते, असा गौप्यस्फोटही यावेळी केला.