(मुंबई)
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्रात भाजपाने ‘नमो 11-सूत्री कार्यक्रम’ राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात पायाभूत आणि विकासावर भर देऊन महिला, शेतकरी, असंघटित मजूर इत्यादींचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने 11 सामाजिक-आर्थिक कल्याणकारी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाद्वारे, आम्ही राज्यभरातील प्रत्येक विभागापर्यंत आम्ही पोहोचू. महाराष्ट्राचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करीत आहेत. मिशन महाराष्ट्र अधिक जोमाने पुढे नेण्याची जबाबदारी आता पक्षाची आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपाने राज्यातील 36 जिल्हे, 355 तालुके आणि 40,000 पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक निकालांबाबत आमचे सर्वोत्तम दावेदार आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतींपासून संसदेपर्यंत आम्ही मोदींना प्रोजेक्ट करू, असे भाजपाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. नमो 11-सूत्री कार्यक्रम स्मार्ट गावे, स्मार्ट शहरे आणि ग्रामीण व शहरी महाराष्ट्रात अधिक जोडणीसह सुधारित रस्ते देण्याचे वचन देते. सरकारी योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवणे, बांधकाम कामगारांना सेफ्टी किट देणे, सौरऊर्जेद्वारे गावे स्वयंपूर्ण बनवणे, प्रशासनात अधिक जबाबदारी आणणे, ग्रामपंचायतींना सशक्त करणे, नवीन रोजगाराचे मार्ग आणि उद्योजक निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांसह, या कार्यक्रमाचा उद्देश वाढ आणि विकास हा देखील आहे.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीमध्ये मोदी हा महत्त्वाचा दुवा आहे. पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास तळागाळातील मतभेद दूर करण्यास मदत करेल आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला समन्वय साधता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची विजयी वाटचाल सुरूच आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्राच्या कल्याणकारी योजनांद्वारे, राज्याच्या पुरेशा पाठिंब्याने, विकास प्रत्येक माणसापर्यंत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल, असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत ‘नमो 11’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. यात मुंबई उपनगरे आणि जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा विकास, शाश्वत विकासासारख्या 11 विषयांशी संबंधित लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.