राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावामध्ये प्रथमच आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी नेण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रायपाटण कोव्हीड केअर सेंटरला दिलेली रूग्णवाहिका तात्काळ उपलब्ध झाल्याने या रूग्णाचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे तुळसवडे सरपंच संजय कपाळे यांनी राणे यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
कोरोना संसर्ग काळात आजपर्यंत तुळसवडे गावात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नव्हता. मात्र काही दिवसापुर्वी फळसमकरवाडीत एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला. तात्काळ त्यांना उपसरपंच संजय कपाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रायपाटण कोविड सेंटर रायपाटण येथे आणले. परंतु पेशंटला व्हेंटिलेटर ची आवश्यकता लागत असल्यामुळे त्यांना तात्काळ भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेवरून युवा कार्यकर्ते समीर खानविलकर यांनी रायपाटण कोव्हीड सेंटरला दिलेल्या रूग्णवाहिकेतुन रत्नागिरी येथे हालवण्यात आले.
यानंतर या रूग्णावर तात्काळ उपचार करण्यात आले. वेळेत या रूग्णाला रत्नागिरीत नेण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. याकामी संजय कपाळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजु भाटलेकर यांनी विशेष प्रयत्न केले. या ठिकाणी औषधपाण्यासाठी लागणारी आर्थिक मदत देखील संजय कपाळे यांनी केली. तात्काळ उपचारांती हा रूग्ण पुर्ण बरा झाला असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून तो सुखरुप घरी आला आहे. उपचारांती सुखरूप घरी परतलेल्या या रूग्णांचा उपसरपंच संजय कपाळे यांनी घरी जावुन पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.