(जळगाव)
भाजपा हे माझ्यापुढील आव्हान नाही, मात्र भाजपा राज्यावर आहे तोपर्यंत देशाचे आणि राज्याचे जे नुकसान होईल ते भरून काढणे हे माझ्यापुढील आव्हान आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला. जळगावच्या पाचोरा येथील जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिले. ते म्हणाले की, हिम्मत असेल तर आता निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही चोरलेले धनुष्यबाण घेऊन या. मोदींचा चेहरा घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. या मशालीची अशी धग लावू की, त्यात तुमचे सिंहासन जळून खाक होईल.
भाजपाला देशात कुठलाही प्रादेशिक पक्ष ठेवायचा नाही, अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणीही सत्य बोलले की त्याच्या विरोधात धाडी टाकल्या जातात. त्याच्यामागे ईडी, सीबीआय लावली जाते. परंतु तोच भाजपात गेला की, त्याला गोमुत्राने अंघोळ घालून शुद्ध केले जाते. सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पुलवामाच्याबाबतीत सत्य सांगितले. तर त्यांना सीबीआयची नोटीस पाठवण्यात आली. त्यांना काही बोलू नका, असे सांगण्यात आले होते.
आज माझ्याबरोबर असलेल्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. पण तुम्ही किती जणांना आत टाकणार आहात? पोलीस पाठवून छळवाद करणे हा नामर्दपणा आहे. अदानीवरून प्रश्न विचारणार्या राहुल गांधींनाही याचप्रकारे त्रास दिला आहे. मी मुख्यमंत्री असताना कुठल्याही धर्मावर अन्याय केला नाही. मी हिंदुत्व सोडलेले नाही आणि सोडणारही नाही. माझे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. भाजपाने आपले हिंदुत्व कसले आहे हे सांगावे, असेही त्यांनी भाजपाला सुनावले. भाजपा पुढची निवडणूक अशा मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली लढणार का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.
ठाकरेंच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे –
- ४० गद्दार गेले तरी फरक पडणार नाही. यांना जसे घोड्यावर चढविले, तसे खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय, त्यांना ही गर्दी दिसणार नाही. पाकिस्तानला विचारा तेही शिवसेना कोणाची ते सांगतील. लवकरच निवडणुका लागतील. आपल्याला या गद्दाराना गाडायचे आहे. महाराष्ट्र हा गद्दारांचा नाही.
- भाजपाला माझे जाहीर आव्हान आहे. मिंधेंच्या नेतृत्वाखाली भाजपा महाराष्ट्रातील निवडणुका लढणार आहे का, बावनकुळेंनी सांगावे त्या ४८ जागा देणार का? आमचे चोरलेले शिवधनुष्य घेऊन या, होऊन जाऊद्या.
- काही जणांना वाटतं की ते म्हणजे शिवसेना, अरे हाट… निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या निष्ठेला, भगव्याला कलंक लावला, तो कलंक लावणारे हात आपल्याला काढून टाकायचे आहेत.
- मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडले. मविआला तीन वर्षे झाली. कधी हिंदुत्व सोडले हे दाखवून द्या, मी आता हे व्यासपीठ सोडून जाईन, असं चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.
- मोदी पूर्वी म्हणायचे, महागाई कमी झाली की नाही झाली…पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले…आता ‘अब की बार’ बस झालं. यांना ‘आपटी बार’ दाखवावाच लागेल,
- सत्यपाल मलिक म्हणाले तसं, यांनी निवडणुकीसाठी जवान मारले असतील, तर अशा लोकांसाठी आपण आपले सुपूत्र यांच्यावर ओपाळून टाकायचे का? यांना किती दिवस चालवून घेणार? या भगव्यावर त्या चोरांचा अधिकार नाही. यांना स्वतःच काही नाही, दुसऱ्यांच चोरावं लागतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
- हे उलट्या पायाचं सरकार हे स्वत:च एक संकट आहे. अवकाळी आलेलं सरकार आहे. गारपीट काय होतेय, अवकाळी पाऊस काय पडतोय. एकदा तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहचली का?
- उद्धव ठाकरे म्हणाले की, आज भाजपकडून गाईला जेवढी सुरक्षा दिली जाते, तेवढी सुरक्षा इथल्या आईला दिली जात नाही. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ठाण्यातील रोषनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. ती हात जोडून कळवळत असतानाही तिच्या पोटात मारलं गेलं. पण तिची तक्रार नोंदवून न घेता, उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला.