(नाशिक)
भाजप पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळेच हे सत्तांतर झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत असंही त्यांनी सांगितलं. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षाला उतरती कळा लागली आहे. शिवसेनेतली गळती भरून काढण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, नाशिक हे शिवसेनेचे महत्वाचं केंद्र आहे. शिवाय प्रत्येकवेळी नाशिक बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहिले आहे. जे काय त्या लोकांचं चाललंय, याकडे नाशिककरांनी लक्ष देऊ नये. नाशिक, नांदगाव, मालेगावमधील प्रत्येक शिवसैनिक आज शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. नाशिकचे सगळे नगरसेवक माझ्यासोबत आहेत, त्यामुळे नाशिकपासून ही सुरवात करत असल्याचेही राऊतांनी सांगितले.
नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे, शिवसेनेने तसे शिवसैनिक घडविले आहेत. जनता वाट पाहते आहे, त्यामुळे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाणार आहोत. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं, काय करतोय हे महाराष्ट्र जाणतोच. राष्ट्रवादी निधी देत नाही, मुख्यमंत्री भेटत नाही, • अशी कारणे दिलीत, मात्र सत्तांतराला कारण एकच आहे ते म्हणजे शिवसेना, भाजप पक्षाला शिवसेना पक्ष फोडायचा नाही तर संपवायचा आहे, हेच भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तसेच राज्यात सत्तांतर झालं खरे मात्र हिंदुत्वादी म्हणवून घेणाऱ्या ४० जणांनी भूमिका स्पष्ट करावी, बंडखोर आमदारांनी स्वतःच अस्तित्व निर्माण करा, महाराष्ट्राची जनता जागरूक आहे, चाणाक्ष आहे. महाराष्ट्रात जे घडलं आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. शिवाय जे आमदार गेलेत. त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, मग आता काय करणार.
तसेच धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत बोलणार आहेत, आज शिवसैनिकांना बरे दिवस आलेत, कारण मुख्यमंत्री शिवसैनिक, विधानसभा अध्यक्ष शिवसैनिक. यावरून असं लक्षात येते की, शिवसेना फोडण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत असा घणाघातही त्यांनी यावेळी भाजपवर केला.