(मुंबई)
‘भाजपविरोधात बातम्या छापून येता कामा नये. भाजपविरोधात बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ढाब्यावर बोलवून चहा पाजा’, असा संवाद असलेली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिक सध्या राज्यभरात व्हायरल होत आहे. बावनकुळे यांनी काल अहमदनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या एका संमेलनात बोलताना वरील उदगार काढले होते. दरम्यान, बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. राज्यभरातील विविध पत्रकार संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्या या दमदाटीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केला.विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी.
काय काय म्हणाले होते बावनकुळे ?
आपल्या चार बूथमध्ये कोणकोणते पत्रकार आहेत, इलेक्ट्राॅनिक पत्रकार आहेत, पोर्टलवाले कोण आहेत. आपण एवढं चांगलं काम करतो; पण तो अशी बातमी देतो की जणू काही बॉम्ब टाकलाय. त्यांना महिन्यातून एकदा चहाला बोलवा. त्यांनी महाविजय २०२३ ला आपल्या विरोधात काहीही लिहीलं नाही पाहिजे. त्यासाठी त्यांना चहाला बोलवा, चहाला म्हणजे कशाला तेही तुम्हाला चांगलंच समजते. पत्रकारांनी आपल्या विरोधात बातम्या न देण्यासाठी त्यांना ढाब्यावर न्या. त्यामुळे त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कोणतीही बातमी आपल्या विरोधात आली नाही पाहिजे, पॉझिटिव्ह बातमी आली पाहिजे.
आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता असतानाच बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. बावनकुळेंचा ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “पत्रकारांना चहा पाजा म्हणजे, पत्रकारांना सन्मान द्या, मतदारसंघात जनतेचा कल काय आहे, हे त्यांच्याकडून जाणून घ्या. पत्रकार इतके महत्त्वाचे आहेत, की ते समाजाचं मत बदलू शकतात. मन बदलू शकतात, शेवटी पत्रकारही एक मतदार आहे. त्याला मत मांडण्यासाठी यायला काय अडचण आहे. त्यांच्याशी कशाला आपण वाईट वागताय. समाजात काय चाललंय हे जरा तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या, असा सल्ला मी त्यांना दिला, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं आहे.