(नवी दिल्ली)
राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवारांनी बंड करून सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या चिन्हावर तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदावरही दावा ठोकला. त्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसोबत शरद पवारांची भेट घेऊन पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आशीर्वाद मागितला. त्यानंतर शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावर अखेर शरद पवारांनी कार्यकर्त्यांकडे आपली मनातील इच्छा व्यक्त केली. शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना पुढील राजकीय रणनितीवर मोठं भाष्य केलं आहे.वक्तव्य केलं आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका, आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा,असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मनात संभ्रम न ठेवता काम करा असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
शरद पवार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुण्यात एक सभा घेणार आहेत. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे १० आमदार निवडून आले आहेत, यातले ८ आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत, तर शरद पवारांसोबत केवळ २ आमदार राहिले आहेत.