महाराष्ट्रात दिवाळीमध्ये केला जाणारा हा पदार्थ आता काॅमन झाला आहे. सकाळी नाष्त्याला चकली खाण्याचंही प्रमाण वाढलं आहे. मुलानाही मधल्या वेळेत चकली खायला आवडते. आपणही चकली करायला जातो, पण कधी चकली खूप कडकच होते, तर कधी अगदीच मऊ पडते आणि तिला मुळीच काटे येत नाहीत. आपल्या चकलीचा प्लॅन असा फसू नये, म्हणून या रेसिपीने चकली करून बघा.
चकलीची भाजणी
- यासाठी वापरायची धान्य स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत. – साहित्य- 3 वाट्या साधे तांदूळ, दीड वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे, पाऊण वाटी धणे, 2 टेबल स्पून जिरे
- सर्वात आधी तांदूळ भाजून घ्यावेत. खूप जास्त लाल होईपर्यंत भाजू नयेत. किंचित गुलाबी रंग आला की गॅस बंद करावा.
- हरभऱ्याची डाळ भाजून घ्यावी.
- त्यानंतर उडीद डाळ भाजून घ्यावी. साधारण लालसर रंग आला की गॅस बंद करावा.
- मग मूगडाळ भाजावी. त्यानंतर पोहे भाजून घ्यावेत.
- पोहे भाजणं अर्ध्यावर आले असतानाच असतानाच त्यात धणे टाकावेत. थोडावेळ तेही एकत्रितपणे भाजून घ्यावेत.
- भाजणी थंड झाल्यानंतर या सर्व मिश्रणात 2 टेबलस्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून आणावी.
- या भाजणीत 40 ते 50 मध्यम आकाराच्या चकल्या होतील.
कुरकुरीत चकलीची रेसिपी-
- 2 वाट्या चकलीच्या भाजणीपासून चकली करुयात.- एका पातेल्यात पाऊण वाटी गरम पाणी, अर्धा टेबलस्पून तिखट, मीठ, अर्धा टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून तीळ, पाव टीस्पून हिंग, 2 टीस्पून तूप टाकावे.
- या पाण्याला उकळी आली की 2 वाट्या चकलीची भाजणी त्यात टाकावी.
- गॅस बंद करून पाण्यात हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे.
- त्यानंतर हे 1 तासभर झाकून ठेवावे.
- तासाभराने पीठ घेऊन साध्या पाण्यात तो मऊसर भिजवून घ्यावा.
- चकली करण्याचं यंत्र म्हणजेच सोऱ्याला आतून तेल लावून घ्यावं.
- त्यात हे पीठ टाकावं. मध्यम आकाराच्या चकल्या बटरपेपरवर किंवा दुधाच्या कॅरीबॅगवर करून घ्याव्यात.
- कढईत तेल घ्यावं. भरपूर तापल्यावर गॅस मध्यम करून त्यात चकली तळून घ्यावी.
- दोन वाटी मिश्रणात साधारण 15 ते 16 चकल्या होतील.
चकल्या बिघडण्याची, नरम पडण्याची कारणे
* भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर, सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे.
* मोहन कमी झाले तर, उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात.
* चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्यास, चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात.
* चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास, भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.
* चकलीचे पिठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास, अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली करावी.
* चकली तेलातून लगेच काढल्यास, चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागेल अशावेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये.
* चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे
* पिठात मोहन जास्त झाले तर – थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.
चकल्या तुटण्याची कारणे
* चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पिठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे. गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचीत मऊ मळावी.