(रत्नागिरी)
खाण व्यवसायात मुलाला भागीदारी देतो सांगून एका महिलेला तब्बल १२ लाख ७५ हजाराला गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार रत्नागिरी शहर परिसरात घडला.
या फसवणुकीबाबत पद्मश्री प्रकाश कासार यांच्या फिर्यादीनुसार अशोक मोहिते, नंदकुमार शिंदे (दोघेही रा. मुंबई) आणि संतोष चव्हाण (रा. खेडशी, रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ऑक्टोबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे.
संतोष चव्हाण याच्यामार्फत संदीप मोहिते व नंदकुमार शिंदे यांची पद्मश्री कासार यांच्याशी ओळख झाली. या दोघांनी खाण व्यवसायासाठी महिलेच्या मुलाला भागीदारी देण्याचे आमिष दाखविले. तसे करारपत्रही करून घेतले होते. त्यानंतर खाणीच्या कामासाठी संदीप मोहिते याच्या बँक खात्यावर १० लाख ५० हजार रुपये पाठविले. तसेच नंदकुमार शिंदे याने ५५ हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर त्यांनी कोणतेच काम केले नाही.
तसेच संतोष चव्हाण याने त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पद्मश्री कासार यांनी पैसे परत मागण्यासाठी फोन केला. त्यावेळी संदीप मोहिते आणि नंदकुमार शिंदे यांनी त्यांना घरी येऊन मारण्याची धमकी दिली. या फसवणुकीबाबत पद्मश्री कासार यांनी नागिरी शहर पोलिस स्थानक गाठले.