( खेड / प्रतिनिधी )
तालुक्यातील चाकाळे येथे चिंचघरी गावातील दोन गटात झालेले वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला 7 ते 8 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंकज वाडकर, प्रशांत वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, रोहन पारटे व त्यांचा भाऊ तसेच अन्य 2 ते 3 इसम (सर्वांचे पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद रोहन राकेश खेडेकर (19, शिवशक्ती अपार्टमेंट, शिवतररोड, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचघर येथे मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास गावातील दोन गटात जोरदार वादावादी सुरु होती. यावेळी रोहन हा आइस्किम खात होता. ग्राऊंडच्या बाहेर जोरजोरात मोठमोठा आवाज येत असल्यामुळे तो त्या ठिकाणी पोहोचला. तेथे 10 ते 12 जण रस्त्यावर वाद घालत होते. दोन गटातील वाद पाहून रोहन हा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेला असता 10 ते 12 जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकाने कानशिलात लगावत लोखंडी कड्याने, काठीने डोक्यात व डाव्या डोळ्याचे खाली मारहाण केली. तसेच चाकाळे गावातील जमलेल्या 7 ते 8 जणांनी कोणतेही कारण नसताना खेचून लाथा बुक्क्यांनी व हाताने मारहाण केली. या मारहाणीत रोहन हा जखमी झाला. त्याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज वाडकर, प्रशांत वाडकर, सुमित बर्गे, सागर कदम, रोहन पारटे व त्यांचा भाऊ तसेच अन्य 2 ते 3 इसम (सर्वांचे पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) अशा 7-8 जणांवर भादविकलम 143, 143, 147, 149, 324, 504, 506, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (ई) चे उल्लंघन केल्याप्रकरणी 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.