(खेड / भरत निकम)
महामार्गावरील भरणे येथील जिल्हा परिषद शाळा येथील निर्जन इमारतीच्या शेजारी तीनपत्तीचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ६ हजार ४७० रुपये जप्त करीत तीन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरणे येथील जिल्हा परिषद शाळे जवळ गेली अनेक वर्षे श्री. लोहार नामक मटका जुगार आणि तीन पत्ती व्यावसायिक याचा मोठा अड्डा चालू आहे. शाळा परिसरात अनेक जुगारी यांचा विळखा कायम असतो. सातत्याने या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार नागरिक करत असतात. मात्र पोलिस खात्याचे या व्यावसायिक यांचेशी लागेबांधे आहेत, असेही तक्रारदार सांगतात. येथील प्रभाकर नागनाथ लोहार (३७), सुरेश प्रकाश लोहार (३२) आणि निलेश महेंद्र शिगवण (४२, तिघे रा. भडगाव, ता. खेड) हे तिघेजण तीनपत्तीचा खेळ खेळवत होते. याची खेडच्या जागृत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने धाड टाकली आहे. या कारवाईत ६ हजार ४७० रुपये रोकडसह जुगार खेळण्याचे साहित्य आणि तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलमानुसार कारवाई केली आहे.
शाळेच्या परिसरात मटकाकिंग बारक्याचा अड्डा
भरणे नाका येथे रत्नागिरी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात सतत जुगार, मटका खेळणारे आणि गर्दुल्ले फिरत असतात. शाळेच्या आवाराजवळ एका मटकाकिंग याची इमारत आणि हाॅटेल आहे. संपूर्ण उत्तर रत्नागिरीतील पूर्ण जुगार खेळ येथूनच खेळवला जातो. शालेय विद्यार्थी व पालक यांना सातत्याने याचा नाहकत्रास सहन करावा लागतो. लहान मुलांच्या जिवीतास येथे धोका असून शालेय जीवनावर याचे दुरगामी परिणाम होत असतो, अशी ओरड नागरिक आणि पालक करीत आहेत. मात्र, या ‘मटका किंग’ ‘बारक्याशेठ’च्या दबावाखाली कुणीही कारवाई करत नाही, असे शाळेतील पालक व नागरिक यांचे म्हणणे असल्याचे बोलले जात आहे.