(खेड / भरत निकम)
भरणेनाका येथील ४८ वर्षीय विठाबाई पवार यांच्या घरातून गुप्तधन काढून देतो सांगत ४० लाख ६५ हजार तर गृहशांतीचे २५ हजार असे एकूण ४० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याने दोघांविरुद्ध फसवणूकीसह जादूटोणा विरोधी कायद्यानुसार येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भरणेनाका गणेशनगर येथे वास्तव्यास असलेल्या ४८ वर्षीय सौ. विठाबाई आण्णाप्पा पवार या मोलमजुरी करुन राहतात. दि. १ मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गिरेवाडी येथील प्रसाद हरिभाऊ जाधव (वय ४८) व त्याच तालुक्यातील करंजवडे गावचा विवेक यशवंत कदम (वय ४८) या दोघांनी तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात गुप्तधन आहे. ते काढून देतो, असे सांगून घरात तंत्रमंत्र वाचून पुजापाठ करीत होमहवन करण्यासाठी प्रसाद हरिभाऊ जाधव या स्वामीने वेळोवेळी ४० लाख ६५ हजार घेतले. तसेच विठाबाई यांचा मुलगा रोहित याच्या गृहशांतीसाठी २५ हजार असे एकूण ४० लाख ९० हजार घेतले होते. या दोघांसमवेत पुजापाठ करण्याकरिता विवेक कदम आणि ओंकार विकास कदम (दोघे रा. करंजवडे, ता. पाटण) यांनी एकमेकांच्या संमतीने फसवणूक केली आहे. या तक्रारीनुसार खेड पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर २५३/२०२३ भादवि कलम ४२०, ४०६, ३४ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(१), २ नुसार प्रसाद जाधव आणि विवेक कदम यादोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.