(खेड / भरत निकम)
शहराजवळील भडगावं खोंडे ग्रा. पं. ने २३ नंबरला ( पूर्वीच्या २६ ) रस्त्याची चुकीची नोंद करून हा रस्ता त्याठिकाणी मागासवर्गीय वस्ती नसतानाही मगासवर्गीयांचा हक्काचा निधी वापरून फसवणूक केल्याप्रकरणी या जागेचे सहहिस्सेदार असलेले श्री. उमेश खेडेकर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने येत्या २४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती खेड येथे सुनावणी होणार असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी श्री. भांड यांनी उपोषणकर्ते श्री. खेडेकर यांना दिल्याने १५ ऑगस्ट रोजीचे उपोषण त्यांनी तूर्तास स्थगित केले आहे.
भडगावं खोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर ८९ हिस्सा नंबर ३ ही ३४ गुंठेची मिळकत ८ हिस्सेदारांची सामायिक मिळकत आहे. मात्र यामिळकती मधून २३ नंबरला रस्त्याची नोंद करण्यासाठी खालिद हुसेन मुल्लाजी या बिल्डरने अर्ज दिल्यानुसार ग्रा. पं. ने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करताच रस्त्याची २३ नंबरला नोंद केली आहे. याबाबत ग्रा. पं. ने मूळ मालकांना विश्वासात घेतलेले नाही. एवढेच करून ग्रामपंचायत थांबली नाही. तर यारस्त्यावर मागासवर्गीयांचा निधी वापरून खर्ची केला. आणि मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणली आहे. हा रस्ता २० जून रोजी पूर्ण तयार करण्यात आला. तर २१ जुन रोजी पडलेल्या पावसात हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला, असे असतानाही रस्ता पूर्णत्वाचा दाखला दिला कोणी ? असा प्रश्न उपस्थित राहत असून, जरी दाखला दिला असला तरी ग्रा. पं. सरपंच, सचिव, सदस्य यांनी या रस्त्याची पाहणी न करताच बिल अदा केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात श्री. खेडेकर यांनी सर्व संबधितांना उपोषणाची पत्रे पाठवून ग्रा. पं. विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल देसाई यांची त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, त्यावेळेस श्री. देसाई यांनी आपणास निश्चित न्याय मिळेल असे सांगितले आहे.
१५ ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे उपोषणास बसल्यानंतर खेड दापोली मंडनगडचे आम. योगेशदादा कदम, उपविभागीय अधिकारी सौ. राजश्री मोरे, तहसीलदार सुधीर सोनावणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, खेड तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्री. दिनेश शिरिषकर, सचिव श्री. श्रीकांत देवळेकर, खेड शहर रोहिदास समाज सेवा संघाचे सचिव श्री. सचिन खेडेकर, बाळकृष्ण खेडेकर, चंद्रकांत शिंदे, आदींनी उपोषण स्थळी भेट दिली. आम. योगेश कदम यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिल्यानंतर उपोषणस्थळी गटविकास अधिकारी श्री. यशवंत भाडं, विस्तार अधिकारी विघ्नेश खांडके, कनिष्ठ प्रशासन सहाय्यक परशुराम इचुर, विस्तार अधिकारी श्री. काणेकर यांनी येऊन खेडेकर यांना याप्रकरणाची २४ तारखेला सुनावणी घेत असल्याचे लेखी पत्र दिले. त्यामुळे श्री. खेडेकर यांनी तूर्तास उपोषण स्थगित केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांची घेणार भेट
ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबरला रस्त्याची चुकीची नोंद करून बिल्डरच्या इमारतीसाठी मागासवर्गीयांचा निधी वापरून मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणली आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र मुणगेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंध ) कायदा १९८९ अन्वये अँट्रोसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे श्री. खेडेकर यांनी सांगितले.