(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्या साखरपा विभागाच्या वतीने दिला जाणारा युवा प्रेरणा पुरस्कार भडकंबा गावाच्या निखिल जामसंडेकर यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि सकाळचे पत्रकार अमित पंडित आणि पोलीसपाटील मारुती शिंदे यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनिय सेवेबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात होणार आहे. हा पुरस्कार प्रहारचे पत्रकार शंकर वैद्य पुरस्कृत करणार आहेत.
मूळचे भडकंबा येथील रहिवासी आणि सध्या टपाल खात्यात सेवा बजावणारे निखिल जामसंडेकर हे शिवप्रेमी आहेत. त्यांनी आजवर २१५ किल्ले सर केले आहेत. अनेक दुर्लक्षित आणि अपरिचित किल्ल्यांचे फोटो आणि माहिती व्हिडिओ स्वरुपात संकलित करण्याचे काम जामसंडेकर यांनी केले आहे. जामसंडेकर यांची निवड २०२४ च्या युवा प्रेरणा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्या साखरपा विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वर्षीपासून पंचक्रोशीत उत्कृष्ठ काम करणाऱ्या एका युवकाला हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या पत्रकार दिनी भडकंबा ग्रामपंचायत इथे हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे सकाळचे पत्रकार आणि शिक्षक अमित पंडित यांना नुकताच सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यानिमित्ताने त्यांचाही सत्कार ह्या कार्यक्रमा दरम्यान करण्यात येणार आहे.
साखरपा येथील पोलिस पाटील मारुती शिंदे हे ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन निवृत्त होत आहेत. त्यांना पत्रकार कै संदेश (मन्या) सप्रे स्मृती आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पत्रकार शंकर वैद्य यांनी पुरस्कृत केला आहे.या कार्यक्रमाचे आयोजन साखरपा मधील पत्रकार शंकर वैद्य, संतोष पोटफोडे, प्रकाश चाळके, भरत माने, अमित पंडित, रमेश शिंदे यांनी केले आहे.