थायलंडमधील ११० बौद्ध भिक्खूनी हजारो वर्षांपूर्वीच्या भगवान बुद्धांच्या अस्थी महाराष्ट्रात आणल्या आहेत. परभणी जिल्ह्यातून सुरू झालेली बौद्ध भिक्खूंची रॅली मुंबईतील दादर चैत्यभूमीपर्यंत चालणार आहे. भगवान बुद्धांच्या अस्थिकलशावर पुष्प अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ही रॅली आज सोमवारी ठाणे शहरात पोहोचली.
भूतान नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष वांगचुक नामग्याल यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत महाराष्ट्राचे माजीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी पर्यटन संबंध वाढविण्यावर चर्चा झाली. नामग्याल म्हणाले की, महाराष्ट्रात भूतान प्रमाणेच बौद्ध धर्माशी संबंधित अनेक स्थळे आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध अजिंठा आणि एलोरा लेणी आहेत.महाराष्ट्राच्या पर्यटन सहकार्यामुळे दोन्ही देशांतील लोकांना प्रवास करण्यास मदत होईल,असे ते म्हणाले.
भारत देखील प्रथमच दक्षिण कोरियातील १०८ बौद्ध यात्रेकरूंचे यजमानपद भूषवत आहेत. दोन्ही देश राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत आहेत. वृत्तानुसार, सांगवोल सोसायटीद्वारे यात्रेचे आयोजन केले जाईल. ही यात्रा १,१०० किमी पेक्षा जास्त अंतर कापेल. नेपाळला जाण्यापूर्वी यात्रेकरू भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देतील. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सहकार्य वाढवणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
या बाबत भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, भारतात बौद्ध पर्यटन सर्किटला प्रोत्साहन देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन होते. काही दिवसांपूर्वी भारतातील ३६ टूर ऑपरेटर्सचा एक ग्रुप भूतानला गेला होता. यादरम्यान देशाला पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.