(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचारी विरोधात भगवतीनगरचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विद्याधर डिंगणकर यांनी रत्नागिरीचे जिल्ह्यधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भगवतीनगर ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंगच लिहिले जात नाही. त्यामुळे पुढच्या ग्रामसभेच्या वेळेला आधीच्या प्रोसिडिंग नसल्याने ग्रामस्थ ग्रामसभाच होऊन देत नाहीत. तसेच ठरावही लिहिले जात नसल्याने, तसेच टाकलेले ठराव बदलले जात असल्याने कार्यालयीन कामकाजच पूर्ण होत नाही. ठरलेले पत्रव्यवहार होत नाही. अनेक योजनांच्या कागदपत्रांचा गोंधळ वाढत असल्याने त्यावर तक्रारी होतात वारंवार ग्रामसेवक तात्पुरत्या स्वरूपात दिले जातात त्यामुळे आधीची कागदपत्र पाहून पुढचे काम करायला त्यांना बरेच महिने द्यावे लागतात, असे निवेदनात नमूद केले आहे.
या सर्वांची तक्रार वारंवार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करून त्यांना तोंडी सुद्धा वारंवार याची कल्पना देऊनही कोणतीच कारवाई केली जात नाही. यामुळेच गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच ग्रामपंचायतची ही अवस्था असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहेे. एकूणच याच कारभाराविरोधात आणि कर्मचारी यांच्या विरोधात भगवतीनगरचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विद्याधर डिंगणकर यांनी रत्नागिरीचे जिल्ह्यधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या सर्व कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.