(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सध्या विद्यार्थ्यांचा खेळाकडील कल कमी झालेला दिसून येत आहे. यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांचा मैदानातील सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे कला-क्रीडा महोत्सव भरवणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी बुरंबी-शिवणे येथे केले.
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आयोजित चौदाव्या दादासाहेब सरफरे आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवाला रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम भुरवणे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस दिलीप मोरे, चिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, कला-क्रीडा समिती अध्यक्ष सचिन मोहिते, विक्रांत जाधव, शांताराम जाधव, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, स्मितल जाधव आदी उपस्थित होते.
पुढे आमदार शेखर निकम म्हणाले की, खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर जाणाऱ्या खेळाडूंच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहुन क्रीडा संस्कृती जोपासून वृद्धिंगत केली पाहिजे.यासाठी लागेल ते सहकार्य आपल्याकडून नेहमी होईल. क्रिडांगणे कमी होत चालली आहेत. आणि मुलांचा मैदानावरील वावर देखील कमी झाला आहे. पण बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेने गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू ठेवला आहे. संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.अशा उपक्रमामुळे राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडू पोहचण्यास मदत होत आहे. यासंस्थेने भव्य क्रीडांगण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मी इंडोअर स्टेडियम करण्यासाठी लागेल ते सहकार्य करेन अशी ग्वाही दिली. त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असेही आमदार शेखर निकम यांनी संस्थेला आश्वत केले.
सहाय्यक शिक्षक संदीप नटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान अनेक वर्ष खो-खोमध्ये ज्यांनी आपले योगदान दिले अशा तालुक्यातील परशुराम पाटील व श्री.खोत या शिक्षकांचा संस्थेच्या वतीने आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.