( संगमेश्वर / दादा जाधव )
मुंबई – गोवा महामार्गावरील वांद्री येथे भरधाव कंटेनर पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना नुकतीच 5.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात पोल तुटून पडल्याने परिसरातील नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. मात्र वांद्री बाजारपेठ येथील शाळा सुदैवाने बचावली आहे. अन्यथा मोठे नुकसान झाले असते.
सविस्तर वृत्त असे की, संगमेश्वरहून गोव्याच्या दिशेने (एमएच 46, एच 1470) हा कंटेनर भरधाव वेगाने चालला होता. वांद्री येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याकडेला असलेल्या विद्युत पोलासहीत पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. येथील ग्रामस्थांनी लगेचच कंटेनर चालकाला वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र कंटेनर पलटी झाल्यानंतर पूर्ण प्राथमिक शाळेच्या काही अंतरावरच तो थांबल्याने शाळा मात्र बचावली आहे. अन्यथा शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात विद्युत पोल उद्ध्वस्त झाल्याचे कळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संगमेश्वर पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.