(लंडन)
१९३७ नंतर ब्रिटनमधील सम्राट किंग चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ८० मिनिटे चाललेल्या या सोहळ्यानंतर राजा-राणी सोन्याच्या रथातून बकिंगहॅम पॅलेसमध्ये परतले. राज्याभिषेकानंतर ब्रिटनमध्ये विविध ठिकाणी तोफांची सलामी देण्यात आली. किंग चार्ल्स तृतीय यांचा संपूर्ण पारंपरिक आणि भव्य-दिव्य असा राज्याभिषेक सोहळा तीन दिवसांनी संपन्न झाला. सोहळ्याच्या अखेरीस शाही कुटुंबाने एकत्रित छायाचित्र काढले. देश-विदेशातील हजारो पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा या शाही सोहळ्याच्या परंपरेचे साक्षीदार असलेल्या करोडो लोकांना या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही पाहता आले.
ब्रिटीश राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्याने प्रथमच नव्या राजा व राणीचे अधिकृत फोटो प्रसिद्ध केले आहेत. सोहळ्यानंतर राजघराण्याने अन्य काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्या फोटोंमध्ये राजा-राणीसोबतच सिंहासनाचा वारसदार प्रिन्स विल्यम व त्याची पत्नी केटही दिसून येत आहेत. अशाप्रकारे ब्रिटनमधील तीन दिवसीय राज्याभिषेक सोहळ्याच्या शेवटी किंग चार्ल्स यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पाहुण्यांचे आभार मानले आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देणाऱ्या सर्वांचे मी व माझी पत्नी आभारी आहोत, तसेच लंडनसह देशभरातील विविध ठिकाणी समारंभांवेळी सुरक्षा व शांतता राखल्याबद्दल सर्वांचे आभार असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.