(रत्नागिरी)
इंडियन ऑईल आणि रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय डुप्लिकेट ब्रिज स्पर्धेत मुंबईच्या अॅमरोना संघाने विजेतेपद पटकावले. या संघात जे. के. भोसले, अमोल देशमुख, श्रीधरन दक्षिणदास हे खेळाडू होते. मुंबईच्या अजिंक्य संघाने उपविजेतेपद आणि यजमान रत्नागिरीच्या संघाने तृतीय स्थान पटकावले. या संघात मोहन दामले, अभय लेले आणि अभय पटवर्धन, माधव आगाशे हे खेळाडू होते. ठाण्याचा समाधान संघ चौथ्या व बोरिवली संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. इंडियन ऑईलच्या संघाने सहावा क्रमांकावर यश मिळवले.
माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात दोन दिवस या स्पर्धा सुरू होत्या. यात महाराष्ट्र, गोव्यातील ८० खेळाडू सहभागी झाले होते. यातील विजेत्या संघाला पुढील स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक दीपकशेठ गद्रे, इंडियन ऑईलचे महाप्रबंधक सुरेश अय्यर, ज्येष्ठ खेळाडू डॉ. गुणेश दीक्षित यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या दिवशी डुप्लीकेट स्पर्धेत १० डावाचे ६ राऊंड खेळवण्यात आले. त्यातून ६ संघ सुपरलीगसाठी पात्र झाले. या ६ संघांचे ५ राऊंड झाल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ओपन पेअर्स स्पर्धेत २० संघांनी भाग घेतला.
ओपन पेअर्स स्पर्धेचे विजेतेपद अरुण बापट व कौस्तुभ बेंद्रे यांनी तर पुण्याचे अविनाश केळकर व सचिन कानगो यांनी उपविजेतेपद मिळवले. पुण्याची गुजराथी- भिडे जोडी तृतीय स्थानावर राहिली. स्पर्धेचे बक्षीस वितरण इंडियन ऑईलचे सुनील आणि संस्थेचे अध्यक्ष उमाकांत सनगर यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे सचिव सचिन मुळे, कार्यवाह सचिन जोशी, चिंतामणी दामले आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.