(रत्नागिरी)
मिरकरवाडा येथील मच्छिमार बोटीवरुन बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास मिरकरवाडा समुद्रात तरंगताना मिळून आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृष्णा ओमप्रकाश डंगौरा (२१,रा.मुळ रा.नैपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे.
याबाबत इस्माईल अब्दुल रउफ साखरकर (३५,रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानूसार,कृष्णा डंगौरा हा जबीन रउफ सारखरकर यांच्या मालकीच्या सुहान सोफियान नावाच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. त्याला दारुचे व्यसनही होते. शुक्रवार १६ डिसेंबर रोजी रात्री १० वा.कृष्णा बोटीवरुन बेपत्ता झाला होता. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याबाबत खबर देण्यात आली होती.
दरम्यान रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास मिरकरवाडा समुद्राच्या पाण्यात कृष्णा डंगौराचा मृतदेह पाण्यात तरंगताना मिळून आला. तो बोटीवरुन प्रातःविधीसाठी जात असताना त्याचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल पालांडे करत आहेत.