( रत्नागिरी / प्रतिनिधी )
बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवणाऱ्या राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईसाठी शासनाने ही पावले उचलली आहेत. शासनाकडून जाहीर झालेल्या 92 जणांच्या यादीत गृह विभागाचे सर्वाधिक कर्मचारी असून महसूल, नगर विकास ऊर्जा, शालेय शिक्षण, लेखा व कोषागार, कृषी सामान्य प्रशासन विभागातही बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवल्याचे उघड केस आले आहे. त्यातील रत्नागिरी जिल्हा परिषदेतील 3 शिक्षण सेवकांचा समावेश आहे. यातील दोघांवर शिक्षण विभागाकडून बडतर्फीची कारवाई झाली असून एकाला नोकरीमध्ये रुजू करून घेण्यात आलेले नाही. याला प्राथमिक शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.
राज्य क्रीडा विभागाने वेबसाईटवर टाकलेल्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील दोन शिक्षण सेवकांचा समावेश आहे त्यामध्ये वैशाली मस्के आशिष चव्हाण यांचा समावेश आहे. अन्य एक शिक्षण सेवकाला रत्नागिरी जिल्हा परिषदेत अजून घेण्यात आले नव्हते. क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर ते बोगस असल्याचे आढळले.
तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेतील एका भरती प्रक्रिया झाली. यामध्ये तीन खेळाडूंनी बोगस प्रमाणपत्र सादर केले होते. हा प्रकार तत्कालीन सामान्य प्रशासन अधिकारी एस. एस. सावंत यांनी उघडकीस आणला होता. त्या प्रमाणपत्राची विशेष तपासणी करून तिघांवर कारवाईसाठी पावले उचलली होती.