(मुंबई)
गुजरातमधील बेस्ट बेकरी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सत्र न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी हा निकाल दिला. हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे गेल्या दहा वर्षांपासून तुरुंगात होते. तर या खटल्यातील जयंती गोहिल आणि रमेश गोहिल या दोन आरोपींचा आधीच मृत्यू झाला आहे. मफत आणि हर्षद यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न पुरावे नष्ट करणे असे आरोप होते. १३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. या खटल्यात बेकरीतील कर्मचाऱ्यासह १० साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
२००२ मध्ये गुजरातमध्ये जातीय साबरमती एक्सप्रेसला लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली होती. त्यात बडोदा येथील हनुमान टेकडी येथे असलेल्या बेस्ट बेकरीला दंगेखोरांनी पेटवले होते. या आगीत बेकरी चालवणार्या शेख कुटुंबासहित १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी २१ जणांना आरोपी केले होते. त्यानंतर २००४ मध्ये या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला मुंबईच्या न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला होता.
मुंबई न्यायालयाने याप्रकरणी २००६ मध्ये २१ पैकी ९ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. चार आरोपी फरार झाले होते. त्यांची नंतर २०१३ मध्ये धरपकड केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या नऊ जणांपैकी पाच जणांची सुटका करण्यात आली. २०१३मध्ये अटक केलेल्या उर्वरित चारपैकी दोन आरोपींचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. उरलेले दोघे हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे १० वर्षांपासून तुरुंगात होते. मंगळवारी सत्र न्यायालयाने या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.