(मुंबई)
गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांडप्रकरणाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे. या प्रकरणी राखून ठेवलेला निकाल न्यायालय उद्या 2 जून रोजी जाहीर करणार आहे. बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला सुरु होता. यातील दोघांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला होता.
1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर जमावाने हल्ला केला. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली. जमावामध्ये हर्षद सोलंकी आणि मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्याच खटल्यावर कोर्ट बुधवारी निकाल जाहीर करणार होते. मात्र हा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलला आहे.
गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत प्रक्षुब्ध जमावाने बेस्ट बेकरी जाळली होती. यामध्ये १४ हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोक मृत्युमुखी पडले होते. बेकरी मालकाची मुलगी झहिना शेख यांनी २१ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामधील १९ जणांना दोषमुक्त करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला मुंबईमध्ये वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा खटला मुंबईत चालविण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. पुढील अनेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात खटला चालला. ९ जुलै २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने संजय ठक्कर, बहादूर सिंग चौहान, सना भाई बारिया आणि दिनेश राजभर या चार दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली, तर इतर ५ आरोपी राजू बारिया, पंकज गोसावी, जगदीश राजपूत आणि सुरेश उर्फ लालू, शैलेश तडवी यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
याप्रकरणी नंतर पकडलेल्या चार फरार आरोपींचा खटला मुंबईच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. चार आरोपींपैकी दोघांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोळंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे मागील १० वर्षे तुरुंगात असून मुंबईतील विशेष न्यायालय सुनावणी पार पडली. अजमेर बॉम्बस्फोट खटल्यातही ते आरोपी होते.