(दापोली)
आर.व्ही.बेलोसे एज्युकेशन फौंडेशन दापोलीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. संस्थेच्या सभापती पदी श्री.शिवाजीराव शिगवण तर उप सभापती पदी श्री.प्रियदर्शन बेलोसे यांची निवड झाली.
कार्यवाह डॉ.दशरथ भोसले यांनी निवडणूक प्रक्रिया सांगून नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांना परिचय करून दिला. याप्रसंगी शिवाजीराव शिगवण यांनी महाविद्यालयाचे गतवैभव व आठवणी सांगितल्या. त्यानंतर त्यांनी यापुढे संस्था व महाविद्यालयाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले.
श्री. शिवाजीराव शिगवण हे कृषी पदवीधर असून ते पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून सेवेत होते. आज या संस्थेतील ४० वर्षाचा सदस्य ते सभापती असा प्रवास त्यांनी पूर्ण केला. तसेच त्यांनी आरोग्य समिती सभासद, खरेदी विक्री संघ संचालक व नगरपंचायत प्रथम नगरसेवक म्हणूनही काम केले आहे.
तर श्री.प्रियदर्शन बेलोसे हे एम.बी.ए असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी विविध नामांकित उद्योग संस्थामध्ये प्रशासकीय पदावर काम केले आहे. त्यांनी आज त्यांच्या पदाचा कार्यभार स्विकारला.
सदर प्रसंगी वराडकर-बेलोसेचे प्राचार्य डॉ.भारत कऱ्हाड यांनी महाविद्यालयातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले. आगामी काळात संस्थेच्या विकासात त्यांचे मार्गदर्शन मिळेल, तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक संशोधन व विकास विषयक कामासाठी त्यांचा अनुभव व मार्गदर्शनाचा फायदा होईल अशी अपेक्षा प्राचार्य डॉ.भारत कऱ्हाड यांनी व्यक्त केली.
पदग्रहण प्रसंगी कार्यवाह डॉ.दशरथ भोसले, सहकार्यवाह श्री.अनंत सणस व संचालिका श्रीमती सुनिता बेलोसे, डॉ.भारत कऱ्हाड व बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.