(रत्नागिरी)
कोतवडे येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह मंगळवार २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. आरे खाडी येथील खाजणात आढळला. या महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमिला प्रकाश राउत (५५, रा. घारपुरेवाडी कोतवडे, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रविवार २३ जुलै रोजी सकाळी ५ वा. अंगावरील मौल्यवान वस्तू घरात काढून ती कोणालाही न सांगता निघून गेली होती. ही बाब तिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी आजुबाजुला शोध घेउन ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली होती.
दरम्यान, मंगळवारी सकाळी कोतवडे गावातील हरिश्चंद्र धावडे, दयानंद पवार, सदाशिव पवार हे आरे गावचे मच्छिमार राजा शिवलकर यांच्या होडीतून प्रमिला राउत यांचा पाण्यात शोध घेत असताना आरे खाडीच्या खाजणात त्यांना प्रमिला यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय ते समजु शकलेले नसून या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.