नात्यातील महिलेसोबत असणाऱ्या अनैतिक संबंधातून बेपत्ता वकिलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी- चिंचवडमधील या वकिलाचा तेलंगाणाच्या सीमेवर अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. पुण्यातील वाकड पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. नात्यातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या महिलेच्या पतीने व अन्य नातेवाईकांनी मिळून शिवशंकर शिंदे यांचे अपहरण केले व हत्या करून मृतदेह अर्धवट जाळला.
वकील शिवशंकर यांचे नात्यातील महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्या महिलेचा विवाह झालेला होता. त्याच्या या संबंधांबद्दल महिलेच्या पतीला माहिती मिळाली होती. यावरून पती-पत्नीत सारखे वाद होत होते. अखेर ती महिला पतीला सोडून राहात होती. याच रागातून आरोपीने शिवशंकर यांचं अपहरण करून हत्येचा कट रचला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिंपरीतील वकील शिवशंकर शिंदे दोन दिवसांपूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर २०२२ पासून त्यांच्या कार्यालयातून कुणालाही न सांगता बेपत्ता झाले होते. त्यांची मोपेड कार्यलयाच्या बाहेरच होती. त्यांच्याशी संपर्कही होऊ शकत नव्हता. वाकड पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यांच्या कार्यालयात रक्ताचे डाग आढळले होते. तपास सुरू असतानाच शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता.
मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त करत नांदेड पोलिसांनी शिंदे यांच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेतलं होतं.
३१ डिसेंबर रोजी महिलेचा पती व त्याचा भाचा आणि चालक यांनी शिवशंकर यांचे त्यांच्या ऑफिसमधून अपहरण केले. एका खासगी वाहनातून शिवशंकर यांना ड्रममध्ये डांबून महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर घेऊन गेले. वाहनातच त्यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शिवशंकर यांचा मृतदेह जाळण्यात आला. परंतु, तो अर्धवट जळाला होता. पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी हत्या केल्याचं तपासात समोर आले आहे.