(लांजा)
गेली दोन वर्ष सारे जग कोरोनासारख्या महामारीचा सामना करीत आहे. त्यातच लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार जाण्याबरोबरच अनेक घरातील कर्त्या पुरूषांचे कोरोना महामारीने किंवा आकस्मिक निधन झाले. त्यामुळे अनेक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या देशात अनेकांनी गरजू कुटुंबियांना त्या काळात जात, धर्म व प्रांतभेद न करता मदत करून माणुसकीचा धर्म पाळला. आता कुठे रोजगार मिळण्याबरोबरच आपली अर्थव्यस्था सावरत आहे.
अशा परिस्थितीत सामाजिक भान ठेवून आमचे गाव बेनीखुर्द, ता. लांजा जि. रत्नागिरी येथील निवदेकर वाडीतील तरुण तानाजी केशव निवदेकर याने आपल्या मित्रमंडळींसमोर आपल्या पंचकोशीतील महामारीच्या काळात ज्या घरातील कर्त्या पुरूषाचे निधन झाले आहे अशा गरजु व गरीब कुटुंबाला या वर्षी दिवाळीत काही किराणा साहित्य देउन मदत करूया असा प्रस्ताव ठेवला.
निवदेकर वाडीतील राजेंद्र दत्ताराम निवदेकर, अमित गणेश निवढेकर, भगवान निवदेकर व बेनीखुर्द गावचे माजी सरपंच संतोष रघुनाथ निवदेकर या तरूणांना ही संकल्पना आवडली. प्रत्येकाने आपल्या आर्थिक परिस्थीतीनुसार आपल्या योगदानाची तयारी दर्शवली. त्यानुसार किराणा यादी तयार केली. साधारणपणे दोन कुटुंबियांना आपण मदत करू शकतो असे लक्षात आले. पंचकोशीतील गरजू कुटुंबाचा शोध घेतला. (मदत केलल्या कुटुंबियांची नावे संकोच वाटू नये म्हणून दिलेली नाहीत ) दिवाळीपुर्वी या कुटुंबियांना किराणा साहित्य, दोन लहान मुलांना कपडे व संबंधित भगिनींना साडी अशी मदत सुपूर्त करण्यात आली.
हा लेख लिहिण्यामागे प्रसिध्दी मिळावी हा हेतू नसून या तरूणांकडून प्रेरणा घेऊन दरवर्षी आपण सर्वानी एकत्र येउन ज्या कुटुंबियांच्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले आहे, अशा आपल्या वाडीतील, गावातील किंवा तालुक्यातील गरीब व गरजू कुटुंबांचा शोध घेउन मदत करावी व आपली सामाजिक भावना जपावी एवढीच अपेक्षा असल्याचे रामचंद्र बडवे, संपर्क प्रमुख कोकणवासीय महासंघ पुणे शहर यांनी कळविले आहे.