( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. बंदी आदेश धाब्यावर ठेऊन पर्ससिन नेटद्वारे होणारी मासेमारी आणि विनापरवाना मासेमारी करणाऱ्या नौकांविरुद्ध शिवसेनेचे उपनेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पर्ससिन नेट, एलईडी आणि विनापरवाना मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांविरुद्ध आपण शासनाकडे पारंपरिक मच्छीमारांची बाजू मांडू आणि ही बेकायदेशीर मासेमारी बंद करण्यास भाग पाडू, असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भास्कर जाधव यांनी दिले.
रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेचे अध्यक्ष रणजित भाटकर, एस. एस. विलणकर, संजय विलकरण, मधुकर शिवलकर, सचिन टाकळे, विरेंद्र नार्वेकर, विनायक मयेकर, दत्तगुरू कीर, सिद्धेश भाटकर, रुपेश पाटील, दिलीप सुर्वे, प्रकाश शिरगावकर आदींच्या शिष्टमंडळाने गुहागरला जाऊन भास्कर जाधव यांची भेट घेतली. पारंपरिक मच्छीमारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यापूर्वीही अनेकदा पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले होते. यापुढेही पारंपरिक मच्छीमारांना न्याय मागण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी आपण शासनाकडून पाठपुरावे कराल, अशी अपेक्षा असल्याचे मच्छीमारांनी आमदार जाधव यांना सांगितले.
बंदी असूनही राजरोस सुरू असलेल्या पर्ससिननेटद्वारे आणि एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीबद्धल तक्रारी केल्या. १२ नॉटीकल मैलच्या बाहेर जाऊन मासेमारी करत असल्याचे सांगून ही मासेमारी सुरू आहे. परवाना नसलेल्या अनेक नौका बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. याबाबत मत्स्य विभागाला निवेदन देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. याबाबत शासनाकडे पारंपरिक मच्छीमारांची बाजू मांडू, असे आश्वासन आमदार श्री. जाधव यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.