(दापोली)
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र यादरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात म्हणजेच शिवसेनेतच वादाला सुरुवात झाली.
बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून वारंवार सडकून टीका केली जात आहे. अशात आता आणखी एक बातमी रत्नागिरीमधून समोर आली आहे.यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे चिपळूणमधील बॅनर दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकले आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्याच दोन गटात वाद चिघळण्याची शक्यता आहे.
महापुरात मदत केल्याबद्दल चिपळूण शहरासह प्रभागवार लावलेल्या आभार बॅनरवरून चिपळूणमध्ये दोन गटात राजकीय संघर्ष पेटला आहे.
रात्री शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. संबंधित बॅनर हे शहराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी लावले होते. हे बॅनर उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी काढून टाकले. यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.