( नवी दिल्ली )
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिने कॅनडाच्या मिशेल ली हिला २१ – १५, २१-१३ असे पराभूत केले. तिच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत भारताच्या खात्यावर १९ व्या सुवर्ण पदकाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, हाताला दुखापत झाली असतानाही सिंधुने उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आणि कोट्यवधी भारतीयांचे मान गर्वाने उंचावली. सिंधूने प्रथमच राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीत मलेशियाच्या जिया याव मिनवर सलग दोन सेट्समध्ये विजय मिळवत पी. व्ही. सिंधूने फायनलमध्ये धडक मारली होती. फायनलमध्ये कॅनडाच्या मिशेल लीशीबरोबर झाली. मिशेलने २०१४च्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.
दुखापतीने त्रस्त असतानाही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
सिंधुने अंतिम सामन्यात असणारा सर्व दबाव झुगारत आत्मविश्वासने सर्वोत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. मिशेलनेही बचावात्मक खेळीने गुण मिळवत चाहत्यांची मने जिंकली. दोघींनी आपले गुण कायम ठेवत सात-सात अशी गुणांची बरोबरी साधली. यानंतर दुखापतीने त्रस्त असतानाही सिंधुने आपला नैसर्गिक आक्रमक खेळ कायम ठेवत सलग आठ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. मात्र यानंतर मिशेलने दुखापतीमुळे सिंधुला आलेल्या मर्यादा हेरत सलग काही गुण पटकावत कमबॅकचा प्रयत्न केला. मात्र यानंतर सिंधुने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत पहिला गेम २१- १५ असा जिकंला.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये सिंधूचं हे बॅडमिंटन महिला एकेरीतलं आजवरचं तिसरं पदक ठरलं आहे.
2014 ग्लास्गोमध्ये कांस्य 🥉
2018 गोल्ड कोस्टमध्ये रौप्य🥈
2022 बर्मिंगहॅममध्ये सुवर्ण🥇