रत्नागिरी/प्रतिनिधी
शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या सहकार्यानं आणि शासकीय जिल्हा रुग्णालय याच्या संयुक्त विद्यमाने 27 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
सकाळी 10 ते 2 या वेळेत शासकीय जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे व त्यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, ई.सी.जी., कॅन्सर, नेत्र व दंत तसेच कान, नाक, घसा तपासणी विविध तज्ज्ञाद्वारे होणार आहे, तरी रत्नागिरी शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांनी या मोफत शिबिरात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असं आवाहन प्राचार्या डॉ. रमा भोसले यांनी केलं आहे.
तसेच 10 वी व 12 वी शिकत असणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दिनांक 27/04/2022 रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे करिअर गाईडन्स करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. तरी पालकांसाठी आरोग्य तपासणी व पाल्यासाठी करिअर मार्गदर्शनचा लाभ घ्यावा, असंही प्राचार्या डॉ. रमा भोसले यांनी कळवलं आहे.