(खेड)
तालुक्यातील गोरगरीब कष्टाळू महिलांना फक्त दोन हजार रुपयांत शिलाई मशिन देतो, असे सांगून बीड येथील एका भामट्याने ८३९ महिलांचे सुमारे २१ लाख १८ हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. महाराष्ट्र क्रांती सेना नावाच्या संस्थेचा राष्ट्रीय युवाध्यक्ष म्हणून सांगणारा संदीप डोंगरे (रा. वाराणी टी. ए. शिरु (कसार, जि. बीड) असे संशयित भामट्याचे नाव असून त्याने केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे काम करतो, अशा भूलथापा देऊन हा गंडा घातला आहे.
श्रमकार्ड योजनेंतर्गत शिलाई मशिन मोफत मिळवून देतो मात्र यासाठी संस्थेचे कर्मचारी काम करत असल्याने त्यांचा पगार, प्रवास भत्ता आदी खर्च संस्थेला करावे लागतात. यामुळे तुम्ही प्रत्येक महिलेकडून २ हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगत संदीप डोंगरे (रा. वाराणी टी. ए. शिरु (कसार), जि. बीड) या संशयिताने बाजारात सुमारे १२ हजार रुपये पेक्षा अधिक किंमत असलेली शिलाई मशिन अवघ्या दोन हजार रुपयात सांगितले. देत असल्याचे मोठ्या संख्येने महिलांशी थेट संपर्क येणाऱ्या एका संस्थेत काम करणाऱ्या महिलांचा त्याने वापर करून त्यांच्या मार्फत या योजनेत अनेक महिलांचे पैसे त्याने जमा केले. मात्र सुमारे पाच महिने उलटूनही अद्यापही शिलाई मशिन न मिळाल्याने या महिलांना आपली फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खेड येथील पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
दरम्यान, याच भामट्याने मोडकळीस व नादुरुस्त असलेल्या महिलांच्या घरांसाठी घरकूल योजनेची माहिती दिली. यासाठी प्रत्येकी रक्कम १० हजार रुपये संस्थेकडे जमा करावे लागतील, असे सांगून लाखो रुपये घेऊन गेल्याचीदेखील तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
या दोन्ही फसव्या योजनांचे आमिष दाखवून ८३९ महिलांचे सुमारे २१ लाख १८ हजार रुपये रकमेसह महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष आसलेल्या संदीप डोंगरे याने येथील महिलांना गंडा घातला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.