[ लांजा / प्रतिनिधी ]
गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवावे आणि २० जुलै रोजी राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिरमध्ये इंद्र देवाराम मेघवाल या आठ वर्षांच्या दलित मुलाला बेदम मारहाणीत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी व इंद्र मेघवाल बालकाच्या कुटुंबास न्याय मिळावा, बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याच्यावतीने तहसीलदार कदम यांना निवेदन देण्यात आले.
२००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचार झाला. या प्रकरणी दोषी ठरलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या ११ गुन्हेगारांना गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी माफी करुन सोडले. त्यामुळे बिल्कीसच्या कुटूंबावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या महोत्सवा प्रसंगी देशाला उद्देशून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नारी का सन्मान करना चाहिये, असे लाल किल्ल्यावरुन संबोधन केले. त्याच दिवशी त्यांच्या राज्यात आरोपीची शिक्षा माफ करुन त्यांना मोकाट सोडले आहे. ही बाब अतिशय घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी आहे. अशांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे सोडलेल्या आरोपींना तात्काळ अटक करुन पुन्हा जेलमध्ये पाठवावे
तसेच राजस्थान राज्यातील जालोर जिल्ल्यातील सुराणा येथील देवराम मेघवाल यांचा मुलगा इंद्र मेघवाल एका खाजगी शाळेत शिकत होता. शाळेत मुलाला जेव्हा तहान लागली व शाळेतील पाण्याच्या मटक्या मधुन पाणी प्यायला म्हणून तेव्हा शिक्षक छैलसिंह याने इंद्र मेघवाल यास बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे इंद्र मेघवाल याचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. या अमानवीय हत्येमुळे बहुजन समाज संतापलेला आहे. त्यामुळे या बालकाच्या नातेवाईकाना न्याय मिळाला पाहीजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याच्या मार्फत तहसीलदार कदम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.