(मुंबई)
अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. हे वादळ तीव्र होऊन १५ जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. यावेळी १२५ ते १३५ किमी इतक्या अफाट वेगाने वारे वाहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या ७५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या चक्रीवादळचा फटका गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबीला बसण्याची शक्यता आहेत. कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातकडे जाणाऱ्या ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बिपरजॉय चक्रवादळामुळे गुजरातला हायअलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बैठक घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ६ जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली. वादळाची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तातडीची बैठक घेतली होती. ज्यामध्ये गृह मंत्रालय, एनडीआरएफ आणि लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. धोकादायक ठिकाणांहून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये १० किमीच्या परिसरातली गावे रिकामी करण्यात आली आहेत. तसेच कच्छमध्ये कलम १४४ लावण्यात आले आहे. आजपासून तीन दिवसांपासून शाळा आणि कॉलेजे बंद ठेवण्यात आली आहेत. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या १२ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. भावनगर, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीधाममध्ये इमरजन्सी कंट्रोल रूम तयार करण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रातून ६ दिवसांपूर्वी बिपरजॉय वादळ निर्माण झाले आहे. हे सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले आहे.