(नवी दिल्ली)
अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय हे चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीकडे वेगाने पुढे असून, तिथे तांडव करील. त्यामुळे प्रचंड धोका निर्माण झाला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहाही विशेष उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या तातडीच्या बैठकीला अमित शहा यांच्यासह प्रमुख सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा, अर्थ सायन्सेस सचिव एम. रविचंद्रन, राष्ट्रीय आपत्ती निवारणचे कमल किशोर, हवामान खात्याचे अधीक्षक मृत्युंजय मोहापात्रा असे सर्व खात्याचे उच्च पदस्थ हजर होते. यावेळी पंतप्रधानांनी चक्रीवादळाची पूर्ण माहिती घेऊन तयारीचा आढावा घेतला. प्रशासनाला तयारीत राहण्याचा आदेश दिला.
बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. आता ते हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आहे. हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या पोरबंदर बंदरापासून 340 किलोमीटर दूर आहे. 15 जूनपर्यंत ते गुजरातच्या किनार्यावर मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनार्यावर धडकणार आहे. यावेळी ताशी 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे सौराष्ट्र, कच्छसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने गुजरातमधील किनारपट्टीचा भाग रिकामा करण्यात येत आहे.
कांडला बंदरात उभी असलेली जहाजे तेथून हटवण्यात आली आहेत. त्याचबरोबर वादळाच्या प्रभावाखाली येणार्या किनारी भागातील नागरिकांनाही बाहेर काढण्यात येत आहे. रुपन बंदरातून 2500 नागरिकांना हटवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. किनारी भागांतील शाळांना 14 आणि 15 जून रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पोरबंदर, राजकोट, जुनागढ, मोरबी, द्वारका, गीर-सोमनाथ आणि वलसाडमध्ये एनडीआरएफला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनीही काल राज्य आपत्कालीन यंत्रणेच्या केंद्राला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.
या वादळामुळे 16 जूनपर्यंत राजस्थानच्या अनेक भागांतही वादळी पावसाची शक्यता आहे. जोधपूर आणि उदयपूर जिल्ह्यांत याचा अधिक परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासी उड्डाणांवरही परिणाम झाला. विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.