(संगमेश्वर)
बाहेर ये…तुला कोयतीने साकटतो… म्हणत शेजाऱ्या शेजाऱ्यात झालेल्या मारहाणीत एक महिला जखमी झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी बौद्धवाडी येथे घडली. या प्रकरणी रमेश लक्ष्मण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात विनोद भागुराम पवार (कळंबुशी बौध्दवाडी) यांनी फिर्याद दिली. विनोद व रमेश पवार एकमेकांचे शेजारी आहेत. रमेश अंगणात खैराचे लाकुड तोडीत असताना ते झाड आपल्या शेतातील असल्याचा संशय विनोदला आला. आई व पत्नीला ते सांगत असताना रमेशने ते एकले. यामुळे विनोदच्या अंगणात येवून त्यांनी शिवीगाळ सुरु केली. यामुळे विनोदने घराच्या दरवाजाला आतून कडी लावली. यावेळी रमेशने कोयती खिडकीवर मारुन बाहेर ये. त्यानंतर तुला कोयतीने साकटतो, अशी धमकी दिली. यानंतर रमेशने दरवाजाखालील पोकळ जागेतून लोखंडी भाला आत घुसवून विनोदची आई शेवंती (68) हिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत केली.
दरम्यान पोलीस पाटील तेथे आल्या असता विनोद, त्यांची पत्नी व आई घराबाहेर आले. यावेळी रमेश काठी घेवून मारण्यासाठी धावत आला आणि विनोद व त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रमेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.