( औरंगाबाद )
आपल्या अमोघ व आक्रमक भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ आणि ठाण्यातील हाय व्होल्टेज सभेनंतर आता औरंगाबाद येथे होणा-या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेत राज काय बोलणार व कोणाची पोलखोल करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. त्यातच त्यांनी भोंग्याबाबत दिलेला 3 मे चा अल्टिमेट या सभेच्या निमित्ताने पुन्हा चर्चेचा विषय ठरणार आहे. औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांच्या या सभेला काही पक्षांकडून तसेच अनेक संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे. 1 मे रोजी मनसेची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानात घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी बाबत पोलिस आणि संबंधित प्रशासन निर्णय घेणार आहेत.
पण तरीही मनसे पदाधिकारी व नेते मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यावर ठाम आहे. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबादमधील पहिली सभा झाली होती. पण राज ठाकरे यांनी सभा घेतली तरी बाळासाहेबांच्या सभेचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकत नाही, असं आव्हान शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी कशी जमा होते, तेच आम्हाला पहायचं आहे. राज ठाकरे यांनी सभा घेतली तरी त्यांना शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड कुणालाही मोडता येणं शक्य नसल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली व त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली तर राज्यासह देशात दंगली घडू शकतात, असं मला सर्वसामान्य जनतेकडून सांगण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, यामुळे आक्षेपार्ह विधाने करून दंगल घडवण्याचा हा एका कट असल्याचे जाणवत असल्याचे ते म्हणाले
औरंगाबाद पोलिसांनी सांस्कृतिक मैदाना एवजी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र मनसे नेते व कार्यकर्ते ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या सभेला परवानगी मिळते का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे.