- (मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून हिंदुत्वासह अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. तसंच शिवाजी पार्कच्या मैदानावरून झालेल्या वादंगाबाबत भाष्य करत एक नवा गौप्यस्फोट केला. ‘तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी आधीच ठरवलं होतं की शिवाजी पार्कचं मैदान त्यांना सभेसाठी देण्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिलेला, मैदान आम्हालाही मिळालं असतं, पण मी या राज्याचा मुख्यमंत्री असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मैदान जरी त्यांना मिळालं असलं तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार मात्र आमच्यासोबत आहेत,’ असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
तुमच्या कॅमेराची तरी नजर जिथपर्यंत पोहोचते का बघा थोडे कॅमेरा तिकडे वळवा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला खरा महासागराचे दर्शन घडवा. मी माझ्या पत्रकार बांधवांना देखील मी सांगू इच्छितो तुमच्या मनातला गोंधळ आता संपला असेल. हा अथांग जनसागर इथे उसळला आहे. शिवसेना कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला नाही तर अखंड हिंदुस्तानाला आज या महासागरांन दिलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहे कुठे आहे ? त्यांच्या विचारांचे वारसदार कोण असा प्रश कुणालाही पडणार नाही. हे या आपल्या गर्दीने सिद्ध केले आहे असे शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्या सोबत आहे. ही परंपरा मोडीत उद्धव ठाकरेंनी मोडीत काढली. हिंदुत्वाच्या विचारांना बगल दिली. बाळासाहेबांच्या भूमिकेला, त्यांच्या विचाराना मूठमाती दिली. त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग मला तुम्ही सांगा तुम्हाला त्या जागेवर उभे राहण्याचा तरी नैतिक अधिकार उरतो का ? बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का ? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो फायद्यासाठी महत्त्वकांक्षासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण का टाकला? बाळासाहेब रिमोट कंट्रोल ने सरकार चालवायचे तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हाला आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचाराचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.