(संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ , कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कलाकारांनी एकत्र येवून केलेला शुभ्र सुगंधित मने या कार्यक्रमात ज्ञान प्रबोधिनी चिपळूण केंद्रच्या छोटे कलाकार उपक्रमातील सहभागी मुलांनी पाठ्यपुस्तकातील कविता सांगितीक स्वरूपात सादर केल्या तसेच गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत शारदा या नाटकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संगीत शारदा नाटकाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या नाटकातील काही नाट्य प्रवेश शालेय वयोगटाच्या मुलांनीच सादर केले.
दोनशेहून जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या या कार्यक्रमात सागरास, बलसागर भारत होवो, वेदमंत्राहून आम्हा ,जयोस्तुते अशा देशभक्ती स्फूर्ती गीतांसोबतच भय इथले संपत नाही एका तळ्यात होती,आकाशी झेप घे रे पाखरा, गोमू माहेरला जाते हो नाखवा अशी विविध प्रसिद्ध भावगीते जी नव्या जुन्या अभ्यासक्रमात कविता म्हणून अभ्यासायला आहेत ती सहभागी गायक कलाकारांनी उत्तम प्रकारे सादर केली व कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोरा होऊन थोर किती, सुंदर खाशी सुबक ठेंगणी या पदांच्या सोबतच जा झणी घेऊन ये पंखा, श्रीमंत पतीची राणी आणि म्हातारा इतुका अवघे पाऊणशे वयमान , अशी गीते साभिनय सादर करुन वन्स मोअर मिळवीत रसिकांची वाहवा मिळविली.
निवेदन, गायन वादन व वाद्य वादन या सर्वच ठिकाणी गुणी सहभागी मुलांचा असलेला मोकळेपणाने वावर रसिक श्रोत्यांना विशेष भावला.ऋचा पातकर आणि सृष्टी तांबे या गुणी गायिकांसोबत पवन मोहिते, श्रावणी संकपाळ, गंधार संकपाळ या नव्याने जोडलेल्या युवा कार्यकर्त्यांना सोबत घेत ज्ञान प्रबोधिनी चिपळूण संपर्क केंद्राच्या छोटे कलाकार उपक्रमाचा प्रमुख विशारद गुरव, सूरज पाटणकर ,युवा नारदीय महिला कीर्तनकार सायलीताई मुळे आणि मानस साखरपेकर, यांनी मुलांकडून हा कार्यक्रम तयार करून घेण्यासाठी विशेष मेहनत घेतली.