(खेड)
बालिकेच्या विनयभंगप्रकरणी आरोपी तरुणाला १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय वर्गचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी बुधवार, ११ ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला. विनयभंगाची ही घटना कोरोना काळामध्ये गव्हे, ता. दापोली- घडली होती.
बौद्धवाडी येथील बुद्धविहारासमोर गव्हे येथील बुद्धविहारासमोरील रस्त्यावर एक पीडित मुलगी आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत सायकल चालवत असताना आरोपी प्रवीण प्रताप भोसले (४०, रा. आंजर्ले, काळाचा कोड, गणपती मंदिराजवळ) याने तिला जवळ बोलावले. आपल्या मोबाइलवर मित्राने चांगले व्हिडीओ टाकले आहेत ते बघ, असे सांगून त्याने तिला अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ५०९ पोक्सो कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासिक अंमलदार म्हणून सहायक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ, कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार एस. बी. गायकवाड यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता मृणाल जाडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी प्रवीण भोसले याला १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व तो न भरल्यास ३ महिन्यांची साधी कैद ठोठावली आहे.